गावगाडा तापला! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले; चावडी अन् पारावर राजकीय गप्पांना उधाण
लोककल्याण न्यूज / संतोष एडके, तासगाव
तासगाव: राज्यात प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच ग्रामीण भागातील ‘गावगाडा’ पूर्णपणे राजकीय रंगात न्हाऊन निघाला आहे. शेतातील बांधांपासून ते गावातील पारापर्यंत आणि चहाच्या टपरीपासून ते सोशल मीडियाच्या भिंतीपर्यंत केवळ निवडणुकीचीच चर्चा रंगू लागली आहे.
गाव पुढारी ‘फर्मात’; गाव पुढाऱ्यांची मनधरणी करताना लागतेय कसरत
निवडणुकीची घोषणा होताच खऱ्या अर्थाने ‘गाव पुढारी’ सध्या पूर्णपणे फर्मात आले आहेत. “गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलीच ओळख आहे,” असा अविर्भाव मिरवणारे हे स्थानिक नेते सध्या भलतेच भाव खाऊन जात आहेत. आपली मतपेढी शाबूत आहे आणि गावातील राजकारण आपल्याच भोवती फिरते, हे दाखवण्यासाठी या पुढाऱ्यांकडून मोठा तोरा दाखवला जात आहे.
दुसरीकडे, संभाव्य उमेदवारांना मात्र या पुढाऱ्यांची मनधरणी करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आपल्या गटाला ताकद मिळावी आणि मतदारांची मोट बांधली जावी, यासाठी या स्थानिक नेत्यांना ‘कसे’ खुश ठेवायचे, याचे गणित मांडताना इच्छुकांनची पुरती दमछाक होताना दिसत आहे. ‘हो-नाही’ च्या चक्रात अडकलेल्या या पुढाऱ्यांच्या एका शब्दावरच अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम खालीलप्रमाणे:
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे:
- फॉर्म भरण्याची तारीख: १६/०१/२०२६ ते २१/०१/२०२६
- अर्जांची छाननी: २२/०१/२०२६
- अर्ज मागे घेण्याची मुदत: २७/०१/२०२६
- चिन्ह वाटप: २७/०१/२०२६
- मतदान: ०५/०२/२०२६
- निकाल: ०७/०२/२०२६
चावडी आणि पारावर रंगल्या राजकीय गप्पा
निवडणूक जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागातील पारावरच्या गप्पांना आता ‘राजकीय धार’ आली आहे. पहाटेच्या वाफाळलेल्या चहाच्या घोटासोबत “आपल्या गटातून कोणाला तिकीट मिळणार?” आणि “समोरच्या पार्टीचा हुकुमी एक्का कोण असेल?” यावर खल सुरू झाला आहे. प्रत्येक चौकात आता संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा आणि विजयाचे आकडे मांडले जात आहेत.
मोर्चेबांधणी आणि राजकीय रचना
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस उरल्याने इच्छुकांनी आता गावपातळीवर ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. कोणता गट सुरक्षित आहे आणि कोणत्या गणात ताकद वाढवायची, याचे गणित मांडले जात आहे. तसेच कोणत्या उमेदवाराला उभे केल्यास कोणाची मते फुटतील आणि त्याचा थेट फायदा कोणाला होईल, याचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ नेत्यांच्या गुप्त बैठकांमध्ये सुरू झाले आहे.
ग्रामीण भागातील या निवडणुका केवळ विकासाच्या मुद्द्यावर नसून, त्या आता ‘प्रतिष्ठेच्या लढाईत’ रूपांतरित झाल्या आहेत. गाव पुढारी कोणाच्या पाठीशी उभे राहणार आणि कुणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
