Blog

खिशात पेट्रोलला पैसा नाही, अन स्टेटस साहेबांच्या नावाचं! मित्रा स्वतःचा ‘ब्रँड’ कधी बनवणार?

Rate this post

लोककल्याण न्यूज / संतोष एडके

मालिका: परिवर्तनाची ठिणगी – दिवस ४.
​ देशभरात सोशल मीडियाचा बाजार झालाय. गल्लीतला ‘ भुरटा ‘ नेता असो वा दिल्लीतले साहेब, त्यांच्या पोरा-बाळांच्या वाढदिवसापासून ते साहेबांच्या लग्नाच्या वाढदिवसापर्यंत, कार्यकर्त्यांचे व्हॉट्सॲप स्टेटस साहेबांच्या फोटोंनी ओसंडून वाहतात. उत्साही कार्यकर्त्यांची अवस्था तर अशी झालीय की, “एक वेळ बाप मेला तरी चालेल, पण साहेब जगला पाहिजे” या उत्साही कार्यकर्त्यांच्या डोक्यात साहेबांच्या विचारांनी इतकं घर केलंय.

. याच प्रश्नाचा आरसा आज दाखवणार आहोत.


घराची चूल पेटेना, अन हा साहेबासाठी पेटून उठलाय!
​अनेक ‘कट्टर’ समर्थकांच्या घरची परिस्थिती पाहिली तर डोळ्यात पाणी येतं. म्हातारा बाप अन थकलेली आई – तर तरुण कार्यकर्त्याची बायको दुसऱ्याच्या शेतात उन्हा-पावसात राबतात, तेव्हा कुठं संध्याकाळी घराची चूल पेटते. पण घरातलं हे वास्तव डोळ्यासमोर असताना, हा ‘रिकामटेकडा’ कार्यकर्ता साहेबासाठी रक्ताचं पाणी करतोय. साहेबाच्या नावानं विरोधकांशी भिडतोय, शिव्या खातोय, गुन्हे अंगावर घेतोय.
पण अरे बाबा, तू तुझ्या साहेबांची एक वेळ खरोखरच परीक्षा घे ! तुझ्या कुटुंबावर एखादं संकट आलं, शहरातल्या एखाद्या महागड्या हॉस्पिटलमध्ये तुझ्या रक्तातील नात्यातील एखादा रुग्ण गंभीर आजाराने अथवा अपघाताने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्याला औषध उपचाराची गरज आहे, संबंधित रुग्णावरती तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्याची गरज आहे तज्ञ डॉक्टर मोठमोठ्या शहरात आहेत त्यांची हॉस्पिटल ही व त्यांची उपचाराचे दरही महागडे आहेत सर्वसामान्य रुग्णांच्या आवाकाच्या बाहेर उपचाराचे दर आहेत अशा परिस्थितीत तू तुझ्या साहेबांना फोन लावून बघ , साहेब पद्धतशीर कशी वेळ मारून नेतात याचा तुला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगदी तू साहेबांच्या पी ए सांगून बघ, “माझ्या माणसासाठी दवाखान्याच्या बिलात थोडा मार्ग करून द्या,” किंवा “माझ्या भावाला-बहिणीला एखाद्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळवून द्या,” तेव्हा तुला कळेल की साहेब कसे ‘बगल’ देतात! फोन उचलणं बंद होतं मित्रा त्यावेळी तुला तुझे लाडके साहेब तुला ओळखायलाही नकार देतात.
​ तुम्ही साहेबांचे ‘खास’ नाही, फक्त ‘आकडा’ आहात!
फेसबुकवर पोस्ट टाकली, कमेंटमध्ये वाद घातला की तुला वाटतं, “आता साहेब आपल्याला जवळ करणार!” पण लेका, साहेबाच्या तू फक्त गर्दीतल्या एका ‘आकड्या’सारखा आहेस. तुझ्या खिशात जेव्हा दमडी नसते आणि घरात दुःखाचा डोंगर कोसळतो, तेव्हा साहेबाचा फोटो तुझी बिलं भरत नाही. साहेबाचं नाव तुझं उपाशी पोट भरत नाही,
“किंग मेकर” की “भिकेचा डोळा”?
​व्हॉट्सॲपवर स्टेटस लावता “किंग मेकर”, “नाद खुळा”, “साहेबांचे वाघ”. अरे, स्वतःच्या बापाच्या कष्टावर वाघ बनून दाखव! दुसऱ्याच्या सावलीत उभं राहून स्वतःला मोठं समजणं ही वास्तव नाही, ती गुलामगिरी आहे. साहेबाच्या गाडीचं दार उघडण्यात आयुष्य वाया घालवण्यापेक्षा, आपल्या घराचं नशिबाचं दार कसं उघडेल हे बघ. साहेबाच्या नावाच्या जीवावर मिरवण्यापेक्षा, लोक तुला तुझ्या कर्तृत्वावरून ओळखले पाहिजेत, असा काहीतरी सत्कार्य करून दाखव.


स्वतःचा ब्रँड कधी बनवणार?
​शहाणपण शिका: राजकारणामागं कुत्र्यावाणी धावण्यापेक्षा स्वतःच्या शिक्षणावर आणि हाताच्या कौशल्यावर लक्ष द्या.
​आर्थिक ताकद कमवा: ज्या दिवशी खिशात स्वतःच्या कष्टाची ‘गांधी’ नोट असेल, त्या दिवशी कोणापुढं हात पसरायची आणि साहेबाच्या गाडीमागं धावायची गरज उरणार नाही.
​ओळख निर्माण करा: ‘हा अमूक साहेबाचा चमचा आहे’ या ओळखीपेक्षा ‘हा एक कर्तबगार माणूस आहे’ ही ओळख निर्माण करा.

थोडं कडू पण तितकच सत्य
कार्यकर्त्यांनो, आता तरी जागे व्हा!
दुसऱ्याचा ब्रँड मोठा करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची ‘राख-रांगोळी’ करून घेऊ नका. नेते येतात आणि जातात, पण तुझं तारुण्य आणि गेलेली वेळ कोणत्याच बाजारात परत मिळणार नाही. आज साहेबाचं स्टेटस लावून तुला थोडा मान मिळेलही, पण उद्या जेव्हा तुझी पोरं मोठी होतील आणि त्यांना शाळेची फी भरायला पैसे नसतील, तेव्हा हा साहेब तुझ्या मदतीला धावून येणार नाही, हे लक्षात ठेव.
​”साहेबाच्या फोटोची फ्रेम पुसण्यापेक्षा, स्वतःच्या कष्टाने घराची परिस्थिती उजळवा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल, त्या दिवशी दुनिया तुम्हाला सलाम ठोकल्याशिवाय राहणार नाही!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!