वासुंबे येथे पाण्याची प्रचंड गैरसोय
ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन हातबल, तर तालुक्यातील प्रशासन निवडणुकीच्या ट्रेनिंग मध्ये गुरफटले, तालुका प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात मग्न.
टँकर मुक्त तालुका घोषणा फक्त कागदावरच, प्रत्यक्षात तीव्र पाणी टंचाई
संपादक – संतोष एडके
तासगाव शहराला लागून असणारे सुमारे सात-साडेसात हजार लोकसंख्येचे वासुंबे गाव सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जात असून ग्रामपंचायत प्रशासनाला, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही ठिकाणी ग्रामस्थांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे.
गेल्यावर्षी अल्प पावसामुळे वासुंबे गावासह तालुक्यातील पूर्व भागातील बऱ्याच गावामध्ये भू गर्भातील पाण्याची पातळी कमालीची खालावली असून परिणामी गावातील सर्वच विहिरी, कुपनलिका, ( बोअर ) ची पाण्याची पातळी प्रचंड खालावली असून जवळजवळ सर्वच ठिकाणी विहिरींनी तळ घातला असून काही बोअर, विहिरी पाण्या अभावी कोरड्या पडलेल्या आहेत

वासुंबे ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण गावा सह विस्तारित वाड्या – वस्ती वरती नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो परंतु गेल्या महिन्यापासून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विहिरीलाच पाणी नसल्यामुळे गावाला सार्वजनिक पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत. गावातील नागरिकांना स्वच्छ मुबलक,पाणीपुरवठा व्हावा या हेतूने गेल्या पंधरा दिवसापूर्वी ग्रामपंचायत मार्फत कुपनलिका ( बोअर ) पाडून पाहिली पण जमिनीमध्ये पाणी नसल्यामुळे बोअर ला अल्प पाणी लागले सदर नवीन बोअर सुद्धा फक्त पाच ते सातच मिनिटं चालते त्यामध्ये ग्रामपंचायतीला पाण्याच्या बाबतीत यश आले नाही. ग्रामपंचायतीने यावरती तोडगा म्हणून गावातील एका ग्रामस्थांची भाडेतत्त्वावर विहीर घेतली असून त्याचा आर्थिक बृदंड ग्रामपंचायत वर पडत असून ग्रामपंचायतीचा गोळा होणारा महसूल हा बऱ्या पैकी पाण्यावरती व टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर खर्च होत आहे. परिणामी गावातील विकास कामे खोळंबलेली आहेत.
ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी पंचायत समिती तासगाव यांच्याकडे भीषण पाणीटंचाई बाबत लेखी कळविल्यानंतर तालुका प्रशासनाच्या मार्फत वासुंबे गावातील एका शेतकऱ्याच्या विहीर अधिग्रहणाचा आदेश कागदोपत्री निघाला, तो आदेश ही ग्रामपंचायतीला प्राप्त झाला परंतु निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचे कारण सांगून तालुका प्रशासन संबंधित शेतकऱ्याकडून विहीर अधिकृतरित्या ग्रामपंचायत देण्यास टाळाटाळ करत आहेत
तालुका प्रशासन लक्ष केव्हा देणार की गावामध्ये पाण्यासाठी भांडण तंटे झाल्यानंतर गावाला पाणी मिळणार अशा तीव्र भावना ग्रामस्थांच्याकडून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ऐकून घ्याव्या लागत आहेत. पाण्याअभावी गावातील व गावाबरोबरच तालुक्यातील पूर्व भागातील पशुधन धोक्यात आले असून जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, तर काही शेतकऱ्यांनी पाण्या अभावी आपली जनावरे बाजारामध्ये येईल त्या किमतीला विकली आहेत बऱ्याच द्राक्ष बागांची छाटणी पाण्याअभावी लांबणीवर पडली आहे. तर काही ठिकाणी द्राक्ष बागायतदार पाण्या अभावी द्राक्ष बागात तोडून टाकत आहेत वासुंबेसह, मतकुणकी,उपळावी, मनेराजुरी, नागाव कवठे एकंद ,कुमठे या गावांच्या मधून जाणाऱ्या आरफळ कॅनॉल, ताकारी कॅनॉल ला पाणी कधी सुटते याची वाट शेतकरी व ग्रामस्थ पहात बसलेले आहेत
ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील ग्रामस्थांना आता ” कोणी पाणी देता का पाणी ” अशी म्हणण्याची वेळ आली आहे
.तालुक्यातील प्रशासन व लोकप्रतिनिधी वासुंबेतील पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार का याकडे संबंध वासुंबेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.