सोशल मीडियाचा ‘कीबोर्ड वॉरियर’ की भविष्याचा निर्माता? – वेळ कुठे घालवताय?
परिवर्तनाची ठिणगी भाग पाचवा
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
”सकाळी डोळे उघडल्यापासनं रात्री झोपेपर्यंत, तुमच्या अंगठ्याखाली कोणाचं नशीब फिरतंय रं? साहेबांचं की तुमचं? फेसबुकच्या ‘लाईक्स’, व्हॉट्सॲपवरील स्टेटस नं घरची चूल पेटत नाय आणि कमेंट बॉक्समध्ये एकमेकांची मापं काढून कोणाचं भलं झालं नाय अन होणार बी नाय!”
तरुण मित्रांनो, ‘लोककल्याण न्यूज’ च्या ७ दिवसांच्या मालिकेतील आजचा पाचवा दिवस. आज जरा तुमच्या काळजाला भिडेल असं लिहिणार हाय, पण ते समाजाच्या हिताचं हाय असं मला वाटतंय . आजचा कार्यकर्ता मैदानात घाम गाळण्यापेक्षा सोशल मीडियावर जास्त ‘थयथयाट’ करायला लागलाय. पण या डिजिटल युगात बळी नक्की कोणाचा पडतोय? जरा डोळे उघडून बघा!
सोशल मीडियावरील साहेबांचा कार्यकर्ता
कुठल्यातरी ऐऱ्या-गैऱ्याने साहेबावर टीका केली की तुमचा बीपी वाढतोय. मग तुम्ही तावातावानं कमेंट बॉक्समध्ये भिडता. समोरच्याला आई-बहिणीवरून शिवीगाळ, तासनतास वाद… तुम्हाला वाटतं तुम्ही साहेबाची बाजू लावून धरली, मी साहेबांच्यासाठी युद्ध जिंकलं! पण अरे लेका, ज्या साहेबासाठी तू रक्ताचं पाणी करतोय, ते साहेब कधी तुझ्या अडचणीला, तुझ्या मदतीला प्रामाणिकपणे धावून आलेत का? त्यातून तुझा भला मोठा फायदा झालाय असं कधी तुला आठवतंय का?
अरे, काही अति उत्साही कार्यकर्त्यांची तर साहेबांना नावंही माहीत नसतात. तर काही वेळा असंही घडतं की, सोशल मीडियावर ज्याच्याशी तू तावातावानं भांडतोय, त्याचं कधी तोंड बी पाहिलं हाय का? नको त्या लोकांशी नको त्या कारणासाठी हे वैर कशाला ओढवून घेतोय?
स्टेटस साहेबांचं, पण तुमचं काय?
दिवसभर मोबाईलमध्ये १०-१० स्टेटस… “वाघाचं आगमन”, “नाद फक्त साहेब”, “भैयासाहेबांचा नादच खुळा”… अरे पण तुझं स्वतःचं करिअर काय? ज्या वयात स्वतःचं साम्राज्य उभं करायचं, त्या वयात तू दुसऱ्याच्या साम्राज्याचा मोफत ‘ढोल’ वाजवतोय. फेसबुकवर हजारो ‘फ्रेंड्स’ असून काय उपयोग, जर ऐनवेळी खिशात १०० रुपये बी नसतील तर? साहेबांच्या पोरांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा स्वतःच्या बापाच्या कष्टाची किंमत कधी समजून घेणार?
मोबाईल मधील डेटा संपतोय अन् तुमचं आयुष्य बी!
दीड-दोन जीबी डेटा रोज कोणासाठी वापरताय? साहेबांचे ते एडिटिंग केलेले व्हिडिओ बघायला? साहेबाच्या पोरांचे परदेशातले ‘चकाचक’ फोटो लाईक करायला? तुमचा वेळ आणि डेटा वापरून आयटी सेलवाले पगार घेतात, नेते सत्तेवर बसतात आणि तुमच्या हातात रात्री फक्त ‘बॅटरी लो’चा मेसेज उरतो! विचार करा, हा डेटा तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी वापरला तर?
तुम्ही समाजासाठी” ब्रँड” बना
सोशल मीडिया वापरायचाच असेल तर तो स्वतःची प्रगती करायला वापरा. तुमच्या शेतीचे नवनवीन प्रयोग, तुमचा छोटा-मोठा धंदा, तुमच्यातली कला जगाला दाखवा. लोकांनी तुमची प्रगती बघितली पाहिजे, तुम्ही फक्त इतरांचे ‘उदो-उदो’ करण्यात आयुष्य घालवू नका. स्वतःच्या हाताला काम द्या आणि डोक्याला चांगल्या कल्पना सुचू द्या, तरच तुम्ही दोन पैसे कमवून घराला आधार देऊ शकाल.
थोडं कडू पण तितकच सत्य
ज्यांच्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर जगाशी नको ते वाद ओढवून घेता, तेच नेते उद्या विरोधकांच्या सोबत हात मिळवणी करून दोघे पक्के विरोधक एकत्र बसून मलिदा खात असतात. मग तुमच्या त्या कमेंटच्या युद्धाचं काय झालं? तुम्ही फक्त एक ‘वापरलं जाणारं साधन’ बनून राहू नका!
तरुणांनो, अंगठा फिरवणं थांबवा अन् डोकं चालवा!
सोशल मीडिया हे प्रगतीचं हत्यार हाय, विनाशाचं नाय. कीबोर्डवर टायपिंग करून कोणाचे भविष्य बदलणार नाही, पण प्रत्यक्ष कामाला लागलात तर तुमचं घर नक्की सुधरेल. समाजामध्ये एक आदर्श नागरिक म्हणून उभे राहा, जेणेकरून जगाने तुमचा आदर्श घेतला पाहिजे!
