साहेबांची ‘थाप’ अन् उध्वस्त ‘बाप’: वेळीच सावध व्हा गड्यांनो!
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
खेडोपाड्यात गावगाड्याच्या राजकारणात दोन-तीन पार्ट्या असणं हे काय नवीन नाही, पण या पार्ट्यांच्या नादात स्वयंघोषित नेत्यांच्या अर्थातच तरुण पोरांच्या नसानसात जी काही ‘खुमखुमी’ धगधगतीये, ती बघून काळजात धस्स होतंय. केवळ गावगाड्यामध्ये साहेबांच्या जवळचा आणि तालुक्याच्या ठिकाणी साहेबांचा “खास माणूस” म्हणून मिरवण्यासाठी आणि साहेबांकडून “शाब्बास रं पठ्ठ्या” “शाब्बास रं पठ्ठ्या” अशी पाठीवर थाप मिळवण्यासाठी हा कार्यकर्ता इतका पेटून उठतो की, त्याला आपलं-परकं काहीच सुचत नाही. यालाच आपल्याकडं म्हणतात— “विनाशकाले विपरीत बुद्धी!”
१. साहेबांच्या गाडीचं दार आणि रक्ताच्या नात्यातलं वैर
साहेबांच्या गाडीचं दार उघडण्यापासून ते सभेच्या स्टेजवर साहेबांच्या मागे उभे राहून फोटो काढण्यापर्यंत या स्वयंघोषित नेत्यांची चढाओढ लागलेली असते. साहेबांना खुश करण्यासाठी आणि अख्ख्या गावाला किंबहुना पंचक्रोशीला “मी साहेबांच्या किती जवळचा आहे” हे दाखवण्यासाठी हा तरुण कार्यकर्ता प्रसंगी सख्खा भाऊ, पाहुणे-रावळे आणि नात्यागोत्यात सुद्धा कायमचं वैर ओढवून घेतो. या इर्षेला पेटलेल्या कार्यकर्त्याला वाटतं की साहेबांमुळे आपली ‘इज्जत’ वाढली, पण खरं तर तो स्वतःच्या हाताने स्वतःचा घात करून घेत असतो.
२. ‘करेक्ट कार्यक्रम’ आणि दहशतीचा नाद
साहेबांच्या विरोधात कोणी काम केले तर “विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्हीच करतो” असल्या फुशारक्या मारून हे अतिउत्साही कार्यकर्ते गावगाड्यात दहशत निर्माण करतात. ही किरकोळ दादागिरी कधी ‘मोठ्या मॅटर’ मध्ये बदलते, हे त्याचं त्यालाच कळत नाही. साहेबांच्या नजरेत “खास कार्यकर्ता” होण्याच्या नादात हातून एखादा गंभीर गुन्हा घडतो आणि आयुष्याची सगळी गणितं विस्कटून जातात.
३. साहेब ‘हात वर’ करतात, तेव्हा सुरू होतं वास्तव!
सगळ्यात मोठी शोकांतिका तेव्हा सुरू होते, जेव्हा हा कार्यकर्ता पोलिसांच्या आणि कायद्याच्या कचाट्यात सापडतो. ज्या साहेबांसाठी त्याने रक्ताचं पाणी केलं, तेच साहेब ऐनवेळी म्हणतात— “तो माझा कार्यकर्ता नाहीच, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी आमचा संबंध नाही!” जर मीडियाने किंवा जनतेने आवाज उठवलाच, तर साहेब “कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात केलं असेल, आम्ही काय करणार?” असं म्हणून स्वतःची सुटका करून घेतात आणि अडचणीत आलेल्या कार्यकर्त्याचा साधा फोनही उचलत नाहीत.
४. जेलची हवा आणि करिअरचा ‘द एंड’
एकदा का जेलवारी झाली की घरची आर्थिक वाताहत सुरू होते. बाप-जाद्यांची जमीन वकिलाच्या फीमध्ये जिरते आणि आईचं डोरलं सावकाराकडं जातं. हा अतिउत्साही कार्यकर्ता जेलमध्ये सजा भोगत असतो, तर दुसरीकडे त्याचे संधीसाधू साहेब नव्या उत्साही कार्यकर्त्याचा शोध घेत असतात.
कडू सत्य:
साहेबांना सतरंज्या उचलणाऱ्या अति उत्साही कार्यकर्त्यांचा तोटा नाही, पण तुमच्या म्हाताऱ्या आई-बापासाठी, बायका-मुलांसाठी आणि भाऊ-बहिणीसाठी तुमच्याशिवाय दुसरा पर्याय नाही! साहेबांची ‘ताकद’ होण्यापेक्षा आपल्या घराचा ‘भक्कम आधार’ बना. कारण साहेब फक्त सत्तेचा विचार करतील, पण तुमचं “कुटुंब मात्र तुमचा आधार “म्हणून तुमची वाट बघत असतं.
