साहेबांची मुलं ‘एसी’त अन् कार्यकर्त्यांची मुलं ‘रॅली’त… हा फरक कधी समजणार ?
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
निवडणूक आली की गावगाड्यात राजकीय वारे वाहू लागतात, पण यात सगळ्यात जास्त धूळ कोणाच्या डोळ्यात जाते? तर ती सामान्य कार्यकर्त्याच्या! साहेबांच्या एका फोनवर रॅलीत धावणारी, घसा कोरडा होईपर्यंत ओरडणारी शाळा-कॉलेजमधली पोरं, तरुण कार्यकर्ते एकदाही विचार करत नाहीत की— ज्यांच्यासाठी आपण रस्त्यावर आहोत, त्यांची मुलं नेमकी कुठे आहेत?
१. तुमची अनवाणी पावलं अन् साहेबांचे ब्रँडेड बूट!
साहेबांच्या रॅलीत गुलालाने माखलेली, घामानं थबथबलेली पोरं आपलीच असतात. काही पोरं तर इतकी पछाडलेली असतात की, “साहेब निवडून येईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही” अशी शपथ घेतात. पण मित्रांनो, कधी विचार केलाय का? तुमच्या पायाला उन्हाचे चटके बसून फोड येतात, आणि तिकडे साहेबांचे ‘भैय्यासाहेब’ मात्र एसी गाडीत बसून परदेशी ब्रँडेड बूट घालून फिरत असतात.
२. भैय्यासाहेबांची ‘फिल्डिंग’ अन् तुमची ‘फरफट’
साहेबांना पक्कं ठाऊक असतं की आपली गादी आपल्याच ‘रक्तातल्या’ वारसाला मिळायला हवी. म्हणून ते जाणीवपूर्वक भैय्यासाहेबांची राजकीय फिल्डिंग लावतात. त्यांना मिसरूड फुटण्याआधीच मलईदार संस्थेचं अध्यक्ष केलं जातं. पण कार्यकर्त्याला मात्र साहेबांच्या पोराचा जयजयकार करण्यापुरतंच मर्यादित ठेवलं जातं. कार्यकर्त्याचा प्रपंच चुलीत गेला तरी चालेल, पण साहेबांच्या वंशाचा राजकीय दिवा तेवत राहिला पाहिजे, हीच साहेबांची सुप्त इच्छा असते.
३. साहेबांची मुलं ‘बोर्डावर’ अन् तुमची पोरं ‘राड्यात’!
गावात राडा झाला की पोलीस कोणाच्या पोराला उचलतात? अर्थातच तुमची-आमची पोरं! केसेस आणि जेल कार्यकर्त्याच्या नशिबी येते. दुसरीकडे साहेबांची मुलं मात्र सोयीनुसार अध्यक्ष-उपाध्यक्ष व्हायची तयारी करतात. जणू सटवाईने त्यांचं नशीब ‘साहेब’ होण्यासाठीच लिहिलंय! पण खरं तर ही सटवाई म्हणजे साहेबांसाठी स्वतःच्या पोराचं भविष्य विसरलेला आपल्यासारखा ‘अविचारी कार्यकर्ता’ आहे.
४. सात पिढ्यांची कमाई अन् गुलामीचा विळखा!
सर्वात जळजळीत वास्तव हेच की, साहेब तुमच्या जिवावर पद मिळवतात आणि आपल्या ‘सात पिढ्यांची’ सोय करून घेतात. साहेब जाणीवपूर्वक कार्यकर्त्याला अडाणी आणि गरजू ठेवतात; कारण कार्यकर्ता जर स्वतःच्या पायावर उभा राहिला, तर तो साहेबांच्या मागे झेंडे घेऊन फिरणार नाही. तुमचे आजोबा-बाप साहेबांच्या घराण्याची चाकरी करण्यात संपले, आता तुम्हीही त्याच वाटेवर आहात का?
कडू सत्य:
साहेबांची मुलं विदेशात शिकतायत आणि तुम्ही रॅलीत घसा सोलताय! साहेबांच्या मुलांची काळजी साहेब घेतील, पण तुमच्या म्हाताऱ्या आई-बापाचं काय? साहेबांची ‘गरज’ होण्यापेक्षा घराचा ‘आधार’ बना. ज्या दिवशी तुम्ही साहेबांच्या मुलाच्या तोडीस तोड शिकून मोठे व्हाल, त्याच दिवशी खरा बदल होईल!
