पत्रकारिता हाच लोकशाहीचा आश्वासक आधारस्तंभ – नगराध्यक्षा विजया पाटील
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमे हा चौथा आधारस्तंभ असून सध्याच्या बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरत आहे. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यात पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन तासगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विजया पाटील यांनी केले.
तासगाव तालुका पत्रकार संघ व डिजिटल मीडियाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘पत्रकार दिन’ सोहळ्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अतुल पाटोळे होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, भाजप तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरूदेव काबुगडे आणि दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगराध्यक्षा विजया पाटील पुढे म्हणाल्या की, “पत्रकार समाजप्रबोधनाचे काम करतात आणि बिघडलेल्या समाजाला योग्य मार्गावर आणण्याची ताकद त्यांच्यात आहे. म्हणूनच आजच्या काळात केवळ प्रसारमाध्यमेच जनतेला आश्वासक वाटत आहेत. प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘अभ्यासाचा भोंगा’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागतील. लोकप्रतिनिधींकडून कामात काही चुका झाल्यास त्या दाखवून देण्याचे काम पत्रकारांनी करावे, जेणेकरून तासगावचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने होईल.”
अध्यक्षीय भाषणात तहसीलदार अतुल पाटोळे यांनी सांगितले की, “आजच्या काळात माध्यमांसमोर अनेक आव्हाने असली, तरी समाजातील उणिवा दूर करण्याचे काम पत्रकारच करत आहेत. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे वाचन कमी झाले असले तरी, बातम्यांची विश्वासार्हता आजही वृत्तपत्रांवरच अवलंबून आहे. पत्रकारांचे जीवन धकाधकीचे असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी विमा पॉलिसी असणे गरजेचे आहे. तासगाव पत्रकार संघाने सर्व पत्रकारांना विमा कवच देऊन एक कौतुकास्पद आदर्श निर्माण केला आहे.”
यावेळी स्वप्निल पाटील यांनी पत्रकारांच्या घरांचा आणि पत्रकार भवनाचा प्रश्न पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तर माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार संघाला नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पत्रकार हे समाजाचे प्रतिबिंब असून अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक त्यांच्यात असल्याचे नमूद केले.
विमा पॉलिसी व जॅकेटचे वाटप:
या कार्यक्रमाचे औचित्य साधून तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकार सदस्यांना तीन वर्षांची अपघाती विमा संरक्षण पॉलिसी आणि जॅकेटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत संकेत पाटील यांनी केले, प्रास्ताविक अध्यक्ष विष्णू जमदाडे यांनी केले तर सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष संजय माळी यांनी केले. शेवटी आभार सचिव प्रदीप पोतदार यांनी मानले. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
