सांगली जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला होणार का?
लोककल्याण न्यूज / संतोष एडके, तासगाव
सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या गुन्हेगारीने संपूर्ण पोलीस यंत्रणेला हादरवून सोडले आहे. खून, “खून का बदला खून से ‘ डबल मर्डर . खुनाच्या घटना तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक आठवड्यालाच नित्याने घडत आहेत.
” अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वाढता सहभाग.
जिल्ह्यामध्ये अनेक गुन्ह्यांच्या मध्ये अगदी किरकोळ भुरट्या चोरांच्या पासून ते मोठमोठे दरोडेच्या घटना, ते अगदी एखाद्याचा मुडदा पाडेपर्यंत अल्पवयीन गुन्हेगारांची वाढलेली मजल हा सांगली जिल्ह्यात च्या दृष्टीने एक चिंतेचा विषय बनू पाहत आहे.
अमली पदार्थांची सहज होणारी उपलब्धता
जिल्ह्यामध्ये सर्वत्र अमली पदार्थांची सहज उपलब्धता, किरकोळ , भुरट्या चोऱ्या पासून ते दरोड्या चे वाढलेले प्रमाण सर्वच प्रकारच्या अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट यामुळे सांगली जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून, जिल्हा ‘गुन्हेगारीचा बालेकिल्ला’ बनतोय की काय, अशी भीती सर्वसामान्य नागरिकांमध्ये पसरली आहे.
“खून, खून का बदला खून से “
जिल्ह्यात प्रत्येक आठवड्यामध्ये खुनाच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. किरकोळ वादातून होणारे खुनी हल्ले, टोळीच्या वर्चस्ववादातून होणारे संघर्ष, त्यातून एकमेकांचे मुडदे पाडण्यापर्यंत झालेली मजल तसेच अनैतिक संबंधातून होणारे खून या घटनांनी पोलिसांची कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. क्षुल्लक कारणांवरून हाणामारी आणि थेट खून करण्याची प्रवृत्ती या युवा पिढीमध्ये दिसून येत आहे. यामागे वाढती व्यसनाधीनता आणि नशेखोरी, चुकीच्या पद्धतीने भाईगिरी चे अनुकरण हे एक मोठे कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अवैध धंदे आणि नशाखोरीचा विळखा
जिल्ह्यात गांजा, गावठी दारू, गुटखा यांसारखे अमली पदार्थ अगदी सहजासहजी उपलब्ध होत आहेत. ‘नशापुरी’ जर गुन्ह्यांचे मूळ कारण असेल, तर या पदार्थांच्या विक्रीच्या मुळावरच घाव घालण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेक गावांमध्ये मटका व्यवसाय आणि अवैध दारू विक्री बिनधास्त सुरू आहे. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीला आर्थिक बळ मिळत आहे, प परिणामी तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या खाईत लोटली जात आहे.
खाजगी सावकारकी आणि ‘भाईगिरी’
जिल्ह्यात काही ठिकाणी खाजगी सावकारांकडून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबलेली नाही. सावकारीतून धमकावणे आणि जबरदस्ती यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. याचबरोबर, ‘फाळकोट दादा’ किंवा गुंडांची वाढलेली मजल आणि त्यांचे वाढते उपद्रव यामुळे सामान्य नागरिक दहशतीत आहेत.
पोलिसांचा कमी झालेला वचक आणि ‘राजाश्रय’
वर उल्लेख केलेल्या सर्व गंभीर बाबींमध्ये पोलिसांचा वचक कमी झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. अवैध धंद्यांवर वचक ठेवण्यात अपयश, वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव आणि काही ठिकाणी गुन्हेगारांना मिळणारा ‘राजाश्रय’ (राजकीय किंवा अन्य क्षेत्रातील पाठिंबा) यामुळे गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप सामाजिक संघटना व नागरिकांकडून होत आहे. अनेक प्रकरणांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या पोलीस तक्रारींची त्वरित दखल घेत नाहीत, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
समाजातील प्रश्न: ‘कायदा व सुव्यवस्थेचे मुडदे’ पडणार का?
सांगलीत सातत्याने होत असलेल्या खुनाच्या घटना आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट पाहता, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे मुडदे पडू लागले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने मूलभूत ‘पोलिसिंग’वर लक्ष केंद्रित करून, गुन्हेगारांना राजकीय आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. जर आताच या गुन्हेगारीला पायबंद घातला नाही, तर सांगली जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला न राहता गुन्हेगारीचा अड्डा बनण्याची भीती आहे. सामान्य नागरिकांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी आणि कायद्यावरचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे.
