पत्रकारिता हाच लोकशाहीचा आश्वासक आधारस्तंभ – नगराध्यक्षा विजया पाटील
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
“सध्याच्या गुंतागुंतीच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत प्रसारमाध्यमे लोकशाहीचा खऱ्या अर्थाने चौथा आधारस्तंभ म्हणून कार्य करत आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यात पत्रकारांचे योगदान अतुलनीय आहे,” असे गौरवउद्गार तासगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विजया पाटील यांनी काढले.

तासगाव तालुका पत्रकार संघ व डिजिटल मीडिया यांच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘पत्रकार दिन’ सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अतुल पाटोळे होते.
लोकप्रतिनिधींना आरसा दाखवण्याचे काम पत्रकारांचे
नगराध्यक्षा विजया पाटील यांनी आपल्या भाषणात पत्रकारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, “समाजप्रबोधन आणि बिघडलेली सामाजिक व्यवस्था सांधण्याचे काम माध्यमांकडून होत आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून आम्ही तासगावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोतच, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या ‘अभ्यासाचा भोंगा’ या उपक्रम तासगाव शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे या नवीन उपक्रमाचा तासगाव शहरातील प्रत्येक विद्यार्थ्यांना व पालकांना उपयोग होईल.

वृत्तपत्रांची विश्वासार्हता आजही अढळ – तहसीलदार अतुल पाटोळे
अध्यक्षीय भाषणात तहसीलदार अतुल पाटोळे म्हणाले की, “सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे माहितीचा ओघ वाढला असला, तरी बातमीची सत्यासत्यता पडताळण्यासाठी आजही लोक वृत्तपत्रांकडेच पाहतात. नकारात्मकतेच्या काळात पत्रकारांनी सकारात्मक समाजाच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे.” पत्रकारांच्या धावपळीच्या जीवनाचा विचार करून त्यांना विमा कवच देण्याचा तासगाव पत्रकार संघाचा निर्णय अत्यंत धाडसी आणि प्रेरणादायी असल्या
पत्रकार भवन व घरांसाठी निधी देण्याचे आश्वासन
भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी पत्रकारांच्या समस्या जाणून घेत, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पत्रकार भवन आणि गृहनिर्माण संस्थेसाठी भरीव निधी मिळवून देण्याची ग्वाही दिली. माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार संघास नगरपरिषदेकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी प्रशासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात माध्यमांच्या महत्त्वाच्या भूमिकेचा उल्लेख केला.
पत्रकारांना ‘सुरक्षा कवच’ व सन्मान
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील सर्व पत्रकारांना तीन वर्षांची अपघाती विमा पॉलिसी आणि जॅकेटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पत्रकार संजय पाटील, तानाजीराव जाधव, चंदू शिकलगार, उत्तम जानकर, दिलीप जाधव, मिलिंद पोळ, प्रशांत सावंत, मारुती कोष्टी, गजानन पाटील, हंबीरराव पाटील, विनायक कदम, अशोक जमदाडे, रमेश मस्के, प्रशांत चव्हाण, गजानन खेराडकर, अजय जाधव, उल्हास सूर्यवंशी, अमोल तुंगे, आबासाहेब चव्हाण, अमोल माने, योगिता माने, किरण देवकुळे, किरण कुंभार, संतोष एडके, अजित माने, निलेश काळबागे आदी पत्रकार उपस्थित होते. स्वागत संकेत पाटील यांनी, प्रास्ताविक अध्यक्ष विष्णू जमदाडे केले तर सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष संजय माळी केले. आभार सचिव प्रदीप पोतदार यांनी मानले
