Blog

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादकांना १००% विमा रक्कम तात्काळ द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा आमदार रोहित आर.आर. पाटील यांचा इशारा!

Rate this post

लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव :

तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत (PMFBY) पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना घेऊनही, २०२४ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या १००% नुकसानीसाठी विमा कंपनीकडून अत्यंत अल्प विमा क्लेम मंजूर झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष पुराव्याची पडताळणी करून १०० टक्के विमा रक्कम तात्काळ न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार रोहित दादा आर.आर. पाटील यांनी दिला आहे.

  • : द्राक्ष उत्पादकांना झालेल्या १००% नुकसानीनुसार, प्रत्यक्ष पुराव्यांची पडताळणी करून, उर्वरित १००% विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
  • उतरवलेला विमा: तासगाव तालुक्यातील ११४१ आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील २२०० द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी बजाज इन्शुरन्स कंपनीकडे ऑक्टोबर २०२४ मध्ये विमा हप्ता भरला होता.
  • विमा कंपनीवर फसवणुकीचा आरोप: विमा कंपनीने प्रत्यक्ष पडलेल्या पावसाच्या नोंदी न घेता क्लेम कमी दाखवला आहे. मांजर्डे सर्कल वगळता इतर सर्वच मंडळांमध्ये कमी पाऊस झाल्याची आकडेवारी दाखवून विमा क्लेम अतिशय अल्प प्रमाणात मंजूर केला.
  • मांजर्डे वगळता अन्याय: मांजर्डे प्रमाणेच, किंबहुना थोडा अधिक पाऊस विसापूर सर्कलमध्ये (हातणूर, विसापूर, हातणोली, बोरगाव, शिरगाव) पडला असतानाही, तेथे अति अल्प विमा दिला गेला. हा ‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्या’ सारखा प्रकार असून, मोठी फसवणूक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  • येणे बाकी रक्कम: तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अजून १० कोटीहून अधिक विमा क्लेम मिळणे बाकी आहे.

आमदार रोहित दादा पाटील यांनी दिला इशारा:

​आमदार रोहित दादा पाटील यांनी शेतकरी प्रतिनिधींच्या समवेत पुणे येथे फलोत्पादन संचालक मा. विनय आवटी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली. विमा कंपनीने केलेल्या या फसवणुकीमुळे, विमा कंपनी, कृषी आयुक्तालय, मंत्रालय आणि कृषिमंत्री यांच्या कार्यालयावर धरणे आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

​माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बापू पाटील यांनी देखील अल्प रक्कम देऊन शेतकऱ्यांना फसवण्याचे काम विमा कंपनीने केले असून, शिल्लक रक्कम तात्काळ न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रशासनाकडून आश्वासन आणि पुढील बैठक:

​द्राक्ष उत्पादकांच्या मागणीनुसार आणि विमा कंपनीकडून झालेल्या दुर्लक्षाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने पाहणी करून दिलासा देऊ, असे आश्वासन फलोत्पादन संचालक विनय आवटी यांनी आमदार रोहित पाटील आणि शिष्टमंडळाला दिले.

निर्णायक बैठक: तासगाव आणि कवठेमहांकाळमधील द्राक्ष विम्याच्या क्लेम संदर्भात बजाज विमा कंपनी मार्फत केलेल्या सर्वे, प्रत्यक्ष पाऊस व नुकसान याची पडताळणी करण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता पुणे येथे विमा कंपनीचे सर्व अधिकारी, आमदार रोहित पाटील आणि सर्व शेतकरी प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन संचालक विनय आवटी यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!