जोतिराम जाधव व शशिकांत डांगे यांचे आमरण उपोषण जाहीर
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
अतिवृष्टीमुळे तासगाव तालुक्यातील द्राक्षे, पेरु, भाजीपाला व इतर सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचा पेराच झाला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकरी चळवळीतील आंदोलक व माजी सैनिक मा. जोतिराम जाधव आणि मा. शशिकांत डांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

येत्या शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून तासगाव तहसील कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सुरू होणार आहे.
या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा इशारा :-
- अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्षे, पेरु, भाजीपाला व सर्व पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत.
- संततधार पावसामुळे ज्यांच्या शेतीत पेराच झाला नाही अशा शेतकऱ्यांना मदत मिळावी.
- कवठे एकंद जुनी चावडी ते चिंचणी मार्गावरील अर्धवट राहिलेले काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावे.
- कवठे एकंद शिवारातील मिरज वाट, डिग्रज वाट, नांद्रे वाट, वाडी-जाधव मळा वाट आदी शिवार रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करावी.
आंदोलकांचे विधान :
मा. जोतिराम जाधव यांनी सांगितले की,
“शेतकऱ्यांच्या न्याय्य प्रश्नांकडे सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. अनेकदा निवेदन देऊनही फक्त निधीअभावाचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे आम्हाला आमरण उपोषणाशिवाय दुसरा मार्ग नाही.”
शेतकऱ्यांचा सहभाग :
या आंदोलनाला शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे मा. बाबासो पाटणे, मा. विवेक पाटील, मा. सिद्राम पाटील (बलगवडे), मा. राजाराम जगताप (बस्तवडे) यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
विशेष लक्षवेधी बाब :
मा. जोतिराम अप्पा जाधव यांचे हे चौदावे आमरण उपोषण
मा. शशिकांत डांगे यांचे हे पाचवे आमरण उपोषण ठरणार आहे.
यामुळे तासगाव तालुक्यातील या आंदोलनाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
