Blog

महावितरणचा सौर ऊर्जेवर हट्ट, शेतकऱ्यांचे पारंपरिक वीज कनेक्शनसाठी आक्रोश

Rate this post

लोककल्याण न्यूज / संतोष एडके, तासगाव

राज्यातील हजारो शेतकरी विहिरीवरील किंवा बोरवेलवरील पाणी उपसा करण्यासाठी नवीन विद्युत कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, महावितरणकडून आता पारंपरिक लाईट कनेक्शनऐवजी केवळ सौर ऊर्जेवर आधारित कनेक्शनच दिले जाईल, अशी सक्ती केली जात असल्याचे समोर आले आहे.


शेतकऱ्यांचा अनुभव : “सौर कनेक्शनवर पाणी पुरवठा अपुरा”

गेल्या दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी महावितरणमार्फत सौर ऊर्जा कनेक्शन घेतले. वीज बिलाची बचत होईल या अपेक्षेने घेतलेले हे कनेक्शन प्रत्यक्षात फारसे उपयोगी पडले नाही, असा अनुभव शेतकऱ्यांचा आहे.

ढगाळ हवामानात किंवा सूर्यप्रकाश कमी मिळाल्यास पंप नीट चालत नाही.

शेतकऱ्यांची तीन ते चार हजार फूट लांबीची पाइपलाइन असल्यास पाणी उच्च दाबाने पोहोचत नाही.

परिणामी पिकांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही.

तासगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्याचे म्हणणे :
“ दोन वर्षांपूर्वी सौर कनेक्शन घेतलं. पण उन्हाळ्यात सुद्धा दोन तीन हजार फूट लांबीच्या पाईपलाईन साठी उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नाही , तर पावसाळ्यात अर्धा दिवस सोलर वरील सप्लाय बंदच राहतो. शेतातील जनावरांना, पाणी देण्यास, पाणी उपसा करण्यासाठी अडचण येते
.


शेतकऱ्यांचा संताप : “सौर ऊर्जेचा हट्ट सोडा, पारंपरिक कनेक्शन द्या”

सुमारे दोन वर्षांपासून राज्यभरातील अनेक शेतकरी सौर ऊर्जेवरील कनेक्शन वापरत आहेत. मात्र, पाणी उपसा करण्यासाठी पुरेसा दाब न मिळाल्यामुळे शेतीला वेळेवर पाणीपुरवठा होत नाही आणि उत्पादन घटत आहे.

नवीन कनेक्शन घेणारे शेतकरी त्यामुळे सौर ऊर्जेबाबत अनुत्सुक आहेत. महावितरणच्या कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांना “फक्त सौर कनेक्शन उपलब्ध आहे” असे उत्तर मिळते, अशी राज्यभरातून तक्रार आहे.

शेतकऱ्यांचा आरोप असा की,

सरकार जाणीवपूर्वक सौर ऊर्जेवर हट्ट धरत आहे.

या हट्टामुळे सौर ऊर्जा कंपन्यांना फायदा मिळतोय, पण शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

या ज्वलंत प्रश्नावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी मौन बाळगत आहेत.
शेतकऱ्यांचा सवाल :

“आमच्या शेतीसाठी खात्रीशीर वीजपुरवठा कधी मिळणार? आमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी गांभीर्याने कधी लक्ष देणार?”


शेतकऱ्यांची आग्रही मागणी :-

शेतकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की राज्य सरकारने पुन्हा पूर्वीसारखी पारंपरिक विद्युत कनेक्शनची सुविधा सुरू करावी.
त्यांचे म्हणणे आहे :
“सौर ऊर्जा हा पर्याय आहे, पण सक्ती नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!