वासुंबे ( तासगांव ) येथे ७९ वा शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न :-
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगांव
वासुंबे ( तासगाव ) येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला.

वासुंबे ग्रामपंचायत कार्यालया समोरील प्रांगणामध्ये शासकीय ध्वजारोहण गावचे लोकनियुक्त सरपंच जयंत दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते , जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, वासुंबे येथील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या हस्ते, सरस्वती नगर जिल्हा परिषद मराठी शाळा, येथील ध्वजारोहण देशवासीयांसाठी सैन्य दलात कार्यरत असणारे गावचे सुपुत्र सचिन जाधव यांच्या हस्ते त्याचबरोबर ब्रम्हनाथ विकास सोसायटी चे ध्वजारोहण चेअरमन धनाजी एडके यांच्या हस्ते करण्यात आले.

आज सकाळी मोठ्या उत्साही वातावरणामध्ये विद्यार्थी – विद्यार्थिनी प्रभात फेरी काढून गावातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते . सर्वांनीच भारतीय स्वातंत्र्याच्या घोषणा,पर्यावरणाच्या रक्षणासाठी च्या घोषणा दिल्या.
शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर गावचे लोक नियुक्त सरपंच जयंत पाटील यांनी ७९ व्या ध्वजारोहणाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा देऊन पर्यावरण रक्षण करणे ही काळाची गरज असल्याची जाणीव सर्वांना करून दिली.
गावचे ज्येष्ठ नेते मा. बाळासाहेब एडके नाना यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लाखो देशभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले हे स्वातंत्र्य आबाधित ठेवून अखंड भारतासाठी सर्वांनी राष्ट्रीय कार्यक्रमासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कस्तुरी पाटील यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या -ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणांचे आहुती दिली त्यांचे स्मरण करून आपण स्वातंत्र्याचे सुराज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले.
आज शैक्षणिक सालामध्ये जिल्हा परिषद मराठी शाळा वासुंबे, सरस्वती नगर जिल्हा परिषद शाळा, गावातील सर्व अंगणवाडी येथे शैक्षणिक उपक्रमामध्ये ज्या- ज्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले अशा सर्वच विद्यार्थी- विद्यार्थिनींचा ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये प्रशस्तीपत्र व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक श्री नवनाथ पोळ, व शिक्षिका सौ सुनीता एडके यांनी केले
आजच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या , ब्रम्हनाथ विकास सोसायटीचे चेअरमन व्हॉ. चेअरमन, सर्व संचालक, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी वर्ग, मराठी शाळेचे विद्यार्थी -विद्यार्थिनी गावातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
