प्लॅस्टिक फुलांवर बंदीसाठी सर्वपक्षीय पाठिंबा :- आमदार रोहितदादा पाटील यांचा पुढाकार
१०५ आमदारांचे स्वाक्षरीद्वारे समर्थन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
राज्यात प्लॅस्टिक फुलांचा वाढता वापर हा फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा धोका ठरत आहे. यामुळे नैसर्गिक फुलांच्या मागणीवर परिणाम होऊन शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार आ. रोहित पाटील यांनी राज्यातील प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
🔹 १०५ आमदारांचा पाठिंबा
या मागणीला राज्यातील विविध पक्षांच्या १०५ आमदारांनी स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शवला आहे. आ. पाटील यांनी विधानभवनात स्वाक्षरी मोहीम राबवून हे पाठिंबा पत्र मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. या पत्रात शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी तातडीने निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
🔹 मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
या निवेदनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये प्लॅस्टिक फुलांवर बंदी आणि पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
🔹 शेतकऱ्यांचे नुकसान आणि पर्यावरणाचा धोका
आ. पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे की, प्लॅस्टिक फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या किमती घसरल्या असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसत आहे. याशिवाय, प्लॅस्टिकपासून बनवलेली ही कृत्रिम फुले पर्यावरणासाठी घातक असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.
🔹 प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंधांची मागणी
प्लॅस्टिक पिशव्या प्रतिबंधासारखेच या फुलांवरही कायमस्वरूपी निर्बंध घालावेत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. फुलशेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा, मजुरी व वाहतूक खर्च यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यामुळे ही बंदी लागू केल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
