तासगाव – कवठेमंकाळ विधानसभा – सोशल मीडियावर कार्यकर्त्यांचा धुमाकूळ.
वेगवेगळ्या आवाजातील, नवनवीन डायलॉग सोशल मीडिया वरती व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले असून राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित करण्याची दुसरी,तिसरी यादी प्रकाशित केली आहे. तर अनेक इच्छुक राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या मार्फत उमेदवारी अर्ज निवडणुका आयोगाकडे दाखल केले आहेत.

सध्या तासगाव – कवठेमंकाळ मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटात तर्फे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे. तर माजी खासदार मा. संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नुकताच जाहीर प्रवेश करून अजित पवार गटामार्फत निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे किंबहुना येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये माजी खासदार संजय काका पाटील हे अधिकृत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर सकल मराठा समाजाचे संघर्ष योद्धा म्हणून परिचित असलेले मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी चर्चेअंती तासगाव तालुका शिवसेना (उभाठा ) गटाचे तालुकाध्यक्ष मा प्रदीप काका माने पाटील हेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे., त्याचबरोबर मेंढपाळ आर्मीचे अर्जुन दादा थोरात, त्याचबरोबर प्रमुख इच्छुक उमेदवाराच्या नावाशी साम्य असणारे अनेक डमी उमेदवार सुद्धा अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत.
सध्या जसजसे विधानसभा निवडणुकीची तारीख अर्थातच २० नोव्हेंबर जसजशी जवळ येईल तसं तसे तासगाव कवठेमंकाळ मधील मुख्य उमेदवार समजले जाणारे युवा नेते रोहित दादा पाटील व व माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तासगाव – कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर आपापल्या नेत्याच्या कार्यकर्तृत्वाचे वेगवेगळ्या आवाजातील नवनवीन डायलॉग प्रसारित होण्याचे प्रमाण मतदार संघातील प्रत्येक गावातील प्रत्येक ग्रुप वरती मोठ्या प्रमाणात व रात्री उशिरापर्यंत चालल्याचे दिसून येत आहे. या मेसेज मधून अनेक ठिकाणी गावागावांमध्ये गावागावातील ग्रुपमधील कार्यकर्त्यांच्या मध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी गावागावातील , भावभावकीतील नातेसंबंधांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. तरुणांनी, उत्साही कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याची कार्य, कर्तुत्व जरूर सोशल मीडिया वरती प्रसारित करावे, पण आपल्या प्रसारित होणाऱ्या चित्रफितीतून व संदेशातून आपण कोणाच्याही भावना दुखावणार नाही, कोणतेही सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक तेढ, निर्माण होणार नाही व कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडणार नाही याची कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी हीच लोककल्याण न्यूज मार्फत राजकीय कार्यकर्त्यांना विनंती.