तासगाव तालुक्यातील डोर्ली येथे वृद्धाची हत्या :- एक संशयित तासगाव पोलिसांच्या ताब्यात.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
तासगाव : तालुक्यातील डोर्ली फाटा बलगवडे येथे राहणाऱ्या लष्करातील
निवृत्त अधिकाऱ्याचा लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान हा खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. संशयित आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
गणपती धोंडीराम शिंदे (वय ६५) असे मृताचे नाव आहे. शिंदे डोर्ली फाटा परिसरात एकटेच रहात होते. त्यांना दोन मुले असून दोघेही नोकरी निमित्त कुटुंबासह परगावी राहतात. गुरुवारी सकाळी स्थानिक लोकांना रक्ताने माखलेला त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली. याची माहिती मिळाल्यानंतर तासगाव पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला आहे. दरम्यान शिंदे यांच्या परिचयातील व्यक्तीने हा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. कोणत्यातरी तात्कालीक कारणावरून हा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी मुलगा अमित शिंदे यांने अज्ञाता विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी अज्ञात कारणावरून वडील गणपती शिंदे यांच्या
डोक्यात, कपाळावर, बरकडीवर लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांचा खून केला असल्याचे म्हटले आहे. संशयित ताब्यात घेतले आहे. पोलिसांना अजून काही जणांवर संशय असून त्यांच्या शोधासाठी एलसीबीची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.
