Blog

साहेबांच्या गाडीचं दार उघडताय की बापाच्या नशिबाचं दार वेशीला टांगताय? – नीट विचार करा!

Rate this post

लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव

“आरं आपले साहेब येणार… साहेब येणार… पळा रं कार्यकर्त्यांनो!”

​गावाकडच्या त्या धुळीच्या रस्त्यावरनं अन् साहेबांच्याच नाकर्तेपणामुळे पडलेले खड्डे चुकवत, साहेबांच्या पांढऱ्याशुभ्र गाड्यांचा ताफा येतो. गाडी थांबायच्या आधीच गावातील ‘स्वयंघोषित नेते’ अर्थातच दहा-पंधरा तरुण कार्यकर्ते उन्हात नीटनेटका साहेबांना शोभेल असा पोशाख घालून वाट पाहत उभी राहतात. कशापाय? तर त्या चकचकीत पांढऱ्या गाडीचा दरवाजा उघडायला! दरवाजा उघडण्यात सुद्धा पोरांची अशी स्पर्धा लागते की, जणू काही त्या दरवाजाला सोन्याचं हँडल लावलंय.

​एकदा का दरवाजा उघडला की साहेब खाली उतरतात, थोडी इकडे-तिकडे नजर मारतात, त्यातीलच एका युवकाच्या खांद्यावर हात ठेवतात, तर दुसऱ्याच्या कानात हळूच कुजबुजतात… ‘काय रं, कसं काय?’ एवढ्या एका वाक्यावर त्या गड्याची छाती फुगून मोठी होती. त्याला वाटतं, साहेबांच्या दरबारात लय मोठी ‘इज्जत’ हाय माझी!

तुझी प्रतिष्ठा की नेत्याची चाकरी?

​साहेबाच्या गाडीचं दार उघडणं हे राजकारण नसतं रं गड्या, ती तुझ्या ‘लाचारीची’ पावती असते. ज्या हातांनी तुझ्या म्हाताऱ्या आई-बापाचा हात धरून त्यांना शेतातून वस्तीवर आणायचं होतं, ज्या थरथरणाऱ्या हातांना या उतरत्या वयात तुझ्या आधाराची गरज होती, तेच तुझे हात आणि तुझं मौल्यवान तारुण्य आज साहेबांच्या गाड्या पुसण्यात, दरवाजा उघडण्यात आणि त्यांच्या सतरंज्या उचलण्यात झिजत आहेत. साहेब गाडीतून उतरून ‘मी तुमच्या गावासाठी किती मोठं काम केलंय’ अशा मोठमोठ्या पोकळ गप्पा मारत स्वतःचीच बढाई मारण्यात व्यस्त असतात. अन् तू? तू मात्र निरागस चेहऱ्याने साहेबांच्या चपलांकडे अन् त्यांच्या चेहऱ्याकडे डोळे लावून उभा असतोस. यालाच तू ‘मोठा माणूस’ होणं म्हणतोयस का मित्रा?

गावच्या उचापती अन् लग्नाचा वांधा!

​आरं, साहेबांच्या मागे फिरून आणि गावभर भुरटं राजकारण करून तुझं वय कुठं चाललंय, याचा कधी हिशोब मांडलाय का? कोणताही उद्योग-धंदा नाही, हाताला काम नाही, पण तोंडात मात्र राजकारणाच्या ‘मोठ्या गोष्टी’! गावच्या पारावर बसून कुणाच्या घरची पोरगी कुणासोबत गेली, कुणाचं काय चाललंय, अशा उचापती करण्यातच तुझं तारुण्य सडलंय. परिणाम काय? आज तुझ्या नावावर साधा कुणी ‘पाहुणा’ (मुलीकडचा) यायला तयार नाही. राजकारणात सतरंज्या उचलणाऱ्याला कुणी पोरगी द्यायला तयार नसतं, हे कधी डोक्यात शिरणार? घरचे लग्नासाठी हुडकायला गेले की लोक विचारतात, “मुलगा काय करतो?” तेव्हा बापाला मान खाली घालून सांगावं लागतं, “साहेबांच्या गाडीसोबत फिरतोय.” मित्रा, साहेबांच्या मागे फिरून तुझं लग्न व्हायचं पण मुश्किल झालंय, हे वास्तव आता तरी समजून घे!

बापाच्या फाटक्या संसाराला कधी ठिगळ लावणार?

​आरं वेड्या, तिकडे तू साहेबांच्या गाडीचा दरवाजा उघडून स्वतःला लय मोठा कार्यकर्ता समजत असशील, पण इकडे तुझ्या घराच्या दाराला गरिबीची गंजलेली कुलूपं लागली आहेत. बापाच्या बंडीला अन् पॅन्टला जोडलेली ती ठिगळं तुला का दिसत नाहीत? तुझे आई-बाप उन्हातानात कधी स्वतःच्या, तर कधी दुसऱ्याच्या बांधावर राबून तुझ्या पोटाची खळगी भरतात.

  • ​तुझा बाप तीच वर्षानुवर्षे फाटलेली चप्पल सांधून वापरतोय.
  • ​तीच गंजलेली मोटारसायकल ढकलून ढकलून चालू करतोय, ज्यात पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकताना तो दहा वेळा विचार करतो.
  • ​तुझ्या बापाचे हे हाल तुझे साहेब कधीच बघणार नाहीत, पण दुर्दैवानं ते तुलाही दिसत नाहीत रं!

घरातल्या म्हाताऱ्या आजीचा दवाखाना अन लहान भाऊ बहिणीचे शिक्षण

​घरात म्हाताऱ्या आजीचं दुखणं-खुपणं औषधाविना पडून आहे. पैशाअभावी शहरातल्या महागड्या दवाखान्यात उपचार घेता येत नाहीत. पैशाअभावीच तुझ्या भावा-बहिणीचं शिक्षण थांबलंय. त्याचं बिल तुझे साहेब भरत नाहीत, की साधी शिक्षणाची विचारपूस सुद्धा करत नाहीत. तुझ्या तोडक्या प्रपंचाची साहेबांना काय काळजी असणार? तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी व्याजाचं कर्ज काढायची वेळ तुझ्या बापावर येते, तेव्हा तुझे साहेब तुला कुठल्या बँकेत साधं अनुदान मिळवून देतात का? की लग्नाचा काही भार उचलतात? याचाही विचार कर मित्रा. तुझे साहेब त्यांचा ‘बंगला’ तुझ्यासाठी गहाण ठेवत नाहीत, पण त्याच वेळी तुझ्या राजकारणाची ‘चवदार’ चेष्टा गावातील लोक पारावर बसून करत असतात.

आता तरी ‘माणूस’ म्हणून जागा हो!

​मित्रांनो, राजकारण नक्कीच करा, पण कुणाचं ‘कुत्रं’ बनून मागे फिरू नका. ज्या दिवशी तू स्वतःच्या घामाच्या पैशातून आई-बहिणीला नवी साडी घेशील आणि स्वतःच्या कमाईतून घेतलेल्या गाडीचा दरवाजा उघडून आपल्या म्हाताऱ्या बापाला सन्मानाने आत बसवून गावभर फिरवशील ना… त्या दिवशी समजून जा की तू खऱ्या अर्थाने तुझ्या ‘नशिबाचं दार’ उघडलं आहेस. साहेबांच्या गाडीची दारं उघडल्याने फक्त साहेबांचीच ‘कॉलर’ ताठ होते, तुझी नाही!

लक्षात ठेवा मित्रा: साहेब सत्तेच्या गादीवर बसतात कारण तुमच्यासारखे तरुण कार्यकर्ते खाली सतरंज्या उचलतात. ज्या दिवशी तुम्ही या सतरंज्या उचलणं बंद कराल आणि स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहाल, त्या दिवशी या नेत्यांना तुमची खरी किंमत कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!