तासगाव-कवठेमहांकाळच्या विकासाला ‘टाटा’ची साथ;आमदार रोहित पाटील यांच्या पुढाकाराने औद्योगिक क्रांतीचे पाऊल
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदार संघातील तरुणांच्या भविष्याला नवी दिशा देण्यासाठी आमदार रोहित दादा पाटील यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मणेराजुरी-योगेवाडी येथे साकारत असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या (MIDC) पार्श्वभूमीवर, आज तासगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन (ITI) मध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या कौशल्य विकास विभागाचे उपाध्यक्ष सुशील कुमार
यांना निमंत्रित करून त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली . यावेळी झालेल्या चर्चेतून या भागाच्या औद्योगिक आणि शैक्षणिक कायापालटाचा आराखडा मांडण्यात आला.
या भेटीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीजचे उपाध्यक्ष सुशील कुमार यांची उपस्थिती आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन. जागतिक स्तरावर तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या टाटा समूहाच्या सहकार्याने तासगाव ITI चा चेहरामोहरा बदलण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. सुशील कुमार यांनी उद्योगांच्या बदलत्या गरजा ओळखून तांत्रिक प्रशिक्षणाचा दर्जा कसा सुधारता येईल, यावर विशेष प्रकाश टाकला. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आपल्या भागातच मिळणे शक्य होणार आहे.


युवा आमदार रोहित पाटील यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मणेराजुरी-योगेवाडी येथे नियोजित असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये (MIDC) केवळ कारखाने उभे न करता, तिथे मोठ्या उद्योगांचे जाळे विणण्याचे नियोजन आमदार रोहित पाटील यांनी आखले आहे. सुशील कुमार आणि त्यांच्या टीमशी होत असलेला हा संवाद आगामी काळात मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. ही वसाहत तासगाव आणि कवठेमहांकाळच्या विकासाची खऱ्या अर्थाने ‘भाग्यरेषा’ ठरेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
केवळ रोजगारासाठी वणवण करण्यापेक्षा, तरुणांना उद्योगांना हवे असणारे ‘तज्ज्ञ’ (Experts) बनवणे ही काळाची गरज आहे. यावर भर देत, मतदारसंघात विशेष स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे येथील तरुणांना केवळ नोकरीच मिळणार नाही, तर ते तांत्रिकदृष्ट्या इतके सक्षम होतील की त्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करण्याची संधी मिळेल.
“तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांतीचा नवा अध्याय आज सुरू झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या कौशल्य विकास विभागाचे उपाध्यक्ष सुशील कुमार यांच्यासोबत झालेली आजची चर्चा मणेराजुरी-योगेवाडी येथील आगामी MIDC साठी अत्यंत फलदायी ठरणार आहे.
आमचा मुख्य उद्देश केवळ औद्योगिक वसाहत उभारणे हा नसून, तेथील उद्योगांसाठी लागणारे उच्च दर्जाचे तंत्रकुशल मनुष्यबळ आपल्याच मतदारसंघातून तयार करणे हा आहे. तासगाव शासकीय तंत्रनिकेतन (ITI) येथे अद्ययावत पायाभूत सुविधा निर्माण करून आपल्या तरुणांना जागतिक स्तराचे ‘स्किल डेव्हलपमेंट’ प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे.
ही औद्योगिक वसाहत तासगाव आणि कवठेमहांकाळच्या विकासाची ‘भाग्यरेषा’ ठरेल यात मला तिळमात्र शंका नाही. शिक्षणासोबतच कौशल्यवृद्धी आणि रोजगारासोबत सक्षम समाजनिर्मिती हाच माझ्या धोरणांचा पाया आहे आणि हा पाया अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत.”
