Blog

अवैध धंद्यांवर कारवाई नाही; आ. रोहित पाटील यांचा पोलिस कार्यक्रमावर बहिष्कार!

Rate this post

सांगलीत ठोस कारवाईशिवाय एकही पाऊल मागे नाही, आमदारांची ठाम भूमिका

लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव

सांगली जिल्ह्यात अवैध धंदे, अमली पदार्थांची खुलेआम विक्री आणि वाढती गुन्हेगारी यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असतानाही पोलिस प्रशासनाची ढिम्म भूमिका उघड दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी संताप व्यक्त करत थेट पोलिसांना जाब विचारला असून, कारवाई करा, नाहीतर आमचा बहिष्कार सहन करा! असा कडक इशाराच दिला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून आलेले भूमिपूजनाचे निमंत्रण नाकारत, आमदार पाटील यांनी पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले. सांगली जिल्हा गुन्हेगारांच्या ताब्यात गेला आहे का? असा जळजळीत सवाल करत त्यांनी प्रशासनाची चांगलीच कोंडी केली आहे.

अमली पदार्थांनी तरुणाई बरबाद होत आहे, गावोगावी अवैध धंदे फोफावत आहेत, आणि पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत, हे नेमकं चाललंय तरी काय? असा थेट सवाल करत त्यांनी पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चोरी, मारामाऱ्या, दहशत यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना, कायदा राखणारेच निष्क्रिय का, असा संतप्त सूर त्यांनी लावला.

याहून गंभीर आरोप करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले की, काही पोलीस कर्मचारीच या अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे “lजनतेचे रक्षण करणारेच जर गुन्हेगारांचे साथीदार बनत असतील, तर न्याय कुठे मागायचा? असा संतप्त प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहे.

आमदार पाटील यांनी इशारा देताना ठाम शब्दांत म्हटले की, जोपर्यंत अवैध धंदे आणि अमली पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद होत नाही आणि संबंधितांवर कठोर, दृश्यमान कारवाई होत नाही, तोपर्यंत पोलिसांच्या कोणत्याही कार्यक्रमात पाय ठेवणार नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे पोलिस प्रशासनाची अक्षरशः गोची झाली आहे.

दरम्यान, या सडेतोड आणि आक्रमक भूमिकेमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिस खडबडून जागे होणार का, की परिस्थिती आणखी बिघडू देणार? असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

आ. रोहित पाटील यांची ठाम व आक्रमक भूमिका

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार रोहित पाटील यांनी विधिमंडळात सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे व अमली पदार्थांमुळे वाढत चाललेली गुन्हेगारी यावर जोरदार हल्लाबोल करत गृह विभागाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले होते. अधिवेशन संपल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका अजिबात मवाळ न करता अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिस प्रशासनाकडून आलेले कार्यक्रमाचे निमंत्रण डावलत त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जिल्ह्यातील अवैध धंदे आणि अमली पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत पोलिसांच्या कोणत्याही कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या या ठाम आणि निर्भीड भूमिकेमुळे सर्वसामान्य जनतेत समाधानाची भावना निर्माण झाली असून, अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये तसेच संबंधित यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!